स्कॉर्पीओतून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना पकडले

स्कॉर्पीओतून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना पकडले 

मोठा दारू साठा जप्त करत तिघांवर गुन्हा दाखल ; भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई 

 । अहमदनगर ।  दि.30 जून । स्कॉर्पीओ गाडी मधून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्या कडून दारूचा साठा व एक स्कॉर्पीओ गाडी असा १५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर जामखेड रोडवरील कँन्टोमेंटच्या बंद पडलेल्या टोलनाक्यावर मंगळवारी (दि.२७) रात्री १० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

भिंगार कॅम्प पोलीसांकडून मंगळवारी रात्री कोंबींग ऑपरेशन राबविण्यात येणार होते, त्यासाठी नेमलेल्या पथकाला  स.पो.नि. दिनकर मुंडे हे सूचना देत असताना त्यांना खबर मिळाली की, नगर शहरातून एक पांढरे रंगाची स्कॉर्पीओ गाडी मधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा अवैधपणे जामखेडकडे नेला जाणार आहे. ही माहिती मिळताच स.पो.नि. मुंडे यांनी तातडीने पथकाला कारवाई साठी पाठविले.

या पथकाने नगर जामखेड रोडवरील कँन्टोमेंटच्या बंद पडलेल्या टोलनाक्यावर नाकाबंदी लावली. काही वेळातच एक पांढरे रंगाची स्कॉर्पीओ (क्र. एम. एच. २३ बी.सी.४०४५) गाडी तेथे आली. तिला पथकाने थांबवले व तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी सदर गाडी व त्यातील तिघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले.

या गाडीत असलेले शहादेव मारूती महाडीक (वय ४२), अक्षय आजीनाथ महाडीक (वय २७, दोघे रा. शेरी बुद्रुक, ता. आष्टी जि. बीड ), नवनाथ दिलीप लोखंडे (वय ३१, रा. चांभार गल्ली, कडा ता.आष्टी जि.बीड) या तिघांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी  संपत भोसले यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, स.फौ. रमेश वराट, पो.हे.काँ. रेवननाथ दहीफळे, संदिप घोडके, रेवन्नाथ मिसाळ, पो.ना. संतोष आडसुळ, दिपक शिंदे, पो.काँ. अमोल आव्हाड, चालक पो.काँ. संजय काळे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post