नागरिकांना चकरा नकोत यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : उपमुख्यमंत्री

नागरिकांना चकरा नकोत यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांची नाहक अडवणूक करणाऱ्या बँकांना कारवाईचा इशारा

। नागपूर । दि.12 जून । समाजातील सामान्यातील सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी हा यंत्रणेचा डोलारा आहे. केवळ आम्ही आयोजित केलेल्या अभियानासाठी नव्हे. तर कायमस्वरूपी कोणालाही कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागू नये यासाठीच ‘शासन आपल्या दारी अभियान ‘, राबवित असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मौदा येथील एनटीपीसी सभागृहामध्ये शासन आपल्या दारी अभियानांतर्गत मौदा उपविभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपविभागीय स्तरावरची ही सहावी बैठक आज पार पडली. यापूर्वी हिंगणा,उमरेड, काटोल ,नरखेड या ठिकाणी मान्सून पूर्व उपविभागीय आढावा तसेच शासन आपल्या दारी अंतर्गत लाभार्थींना विविध योजनातून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते.

सकाळी रामटेक नंतर मौदा येथे बैठकीत बोलताना त्यांनी शासन आपल्या दारी हे केवळ अभियान नसून ही यंत्रणेला कायमस्वरूपी सवय व्हावी, असे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ आज मंत्री आले म्हणून लाभार्थींना लाभ दिले जाऊ नयेत. यंत्रणाच कायमस्वरूपी अशा पद्धतीची बनावी की, न्याय हक्कासाठी कोणालाही शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत. प्रत्येकाचे लाभ त्याच्या घरापर्यंत त्याला मिळाले पाहिजे. शासकीय यंत्रणांनी आता लाभार्थींपर्यंत जाण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला बदलून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर ,आशिष जायस्वाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील व उपविभागातील अधिकारी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले. तत्पूर्वी, विविध योजनांतील लाभार्थ्यांना पट्टेवाटप, प्रमाणपत्र वाटप, तसेच लाभाच्या योजनांचे पत्र देण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी अभियानाच्या उद्दिष्ट पूर्तीबद्दल गांभीर्याने काम करण्याचे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. सुमारे दीड लाख नागरिकांना लाभ द्यायचा आहे. एकही अर्ज प्रलंबित राहू नये. ज्यांना काम करताना अडचणी येतील त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील. मात्र, अडचणी सांगणारे अधिकारी बनू नका. अडचणी सोडवणारे अधिकारी बना व लोकांच्या दारावर योजना पोहोचविण्याची सवय अंगवळणी पाडा ,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post