हॉकर्सकडून मनपाच्या वसुलीसाठी बालकामगारांना जुपणाऱ्यांवर कारवाई करा : किरण काळेंची मागणी
उद्यान विभागाचे कर्मचाऱ्यांकडून हप्ता वसुली जोरात, आयुक्तांना काँग्रेसचे निवेदन
। अहमदनगर । दि.12 मे 2023 । महापालिकेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यानाबाहेर असणाऱ्या हॉकर्स कडून मनपाच्या वतीने अधिकृत पावती देते करण्यात येणाऱ्या वसुली कामासाठी बालकामगारांना जुंपण्यात आले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्याचा फोटोसह पुरावा देत मनपा आयुक्त पंकज जावळे यांना लेखी निवेदन देऊन बालकामगारांना जुंपणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने केली आहे. दरम्यान, उद्यान विभागाचे कर्मचारी हॉकर्सकडून दरमहा तीन हजार रुपयांची हप्ता वसुली करत असल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना काळे म्हणाले की, मी स्वतः महालक्ष्मी उद्यान येथून जात असताना हा धक्कादायक प्रकार पाहिला. त्यावेळी मी थांबून सदर बालकामगाराशी संवाद साधला. त्यावेळी त्याने आपण मनपाच्या वतीने अधिकृत पावत्या देऊन पैसे गोळा करत असल्याचे सांगितले. काँग्रेसने याबाबत आयुक्तांना लेखी पत्र देत ही अत्यंत धक्कादायक व गंभीर बाब असून मनपा सारख्या शासकीय आस्थापनेकडून जर बालकामगार ठेवले जात असतील आणि आयुक्त हा प्रकार कोणतीही कारवाई न करता उघड्या डोळ्यांनी पाहत पाठराखण करणार असतील तर हे संतापजनक असल्याचे म्हटले आहे.
लहान मुलांनी शाळेत शिकले पाहिजे. खेळल पाहिजे. त्यांचं बालपण हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यांच्यासाठी काही चांगलं करता येत नसेल तर किमान त्यांना बालमजूर म्हणून जुंपू तरी नका. या घृणास्पद प्रकाराबद्दल काळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय देखील याच रोडवर असून त्यांच्या कार्यालयाजवळ देखील बालकामगार वसुली करत आहेत. या कार्यालयासमोरच जर बाल कामगारांकडून काम करून घेतले जात असेल आणि त्यांच्याकडूनही कारवाई होत नसेल तर हे रोखणार कोण ? असा सवाल काळे यांनी केला आहे.
काय सांगतो कायदा :
बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ मधील तरतुदीनुसार वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. नियमभंग करणाऱ्यांना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास, व त्यासोबत रु.१०,००० ते रु.२०,०००/- दंड करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांवर या कायद्याअंतर्गत मनपाच्या वतीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने काळे यांनी केली आहे. या पत्राची प्रत आयुक्तांसह जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील देण्यात आली आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त यांची अनास्था :
याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांना टीप देण्यात आली होती. ज्यावेळी ही वसुली प्रत्यक्षात सुरू होती त्यावेळी त्यांना दूरध्वनीद्वारे रेड मारण्यासंदर्भात मागणी केली असता त्यांनी कार्यालय बंद झाले असल्याचे कारण पुढे करत या विषयावर अनास्था दाखवली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
हप्ता वसुली जोरात :
काळे म्हणाले की, येथील हातावर कष्ट करून पोट भरणाऱ्या गोरगरीब हॉकर्सवर प्रचंड दबाव आहे. दरमहा प्रत्येकी ३००० रुपयांचा हप्ता उद्यान विभागाचे कर्मचारीच वसूल करतात. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. हप्ता दिला नाही तर गाडी लावू देणार नाही. अतिक्रमण विभागाला पाठवून कारवाई करू. अशा धमक्या दिल्या जातात. सध्या गोरगरिबांना पोट भरू द्यायचे नाही असा अजेंडा राबविला जात आहे. प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अठरा वर्षानंतर बसविण्याची जाग मनपाला आली आहे. उशिराने सुचलेल्या शहाणपणाचे काँग्रेस स्वागत करते. मात्र या चौकातील खाद्य विक्रेत्या हॉकर्सचे पुनर्वसन मनपाने केलेले नाही.
बाजारपेठेतील हॉकर्सचे देखील अद्याप पर्यंत पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे व्यापारी व फेरीवाले यांच्यातील संघर्ष पुन्हा समाज विघातक शक्तींकडून पेटवला जाऊ शकतो. बाजारपेठेचे नुकसान केले जाऊ शकते. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शहरातील सर्वच भागात काम करणारे गोरगरीब हॉकर्स, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजी, फळ विक्रेते यामुळे राजकीय दबावातून आपल्यावर केव्हाही अतिक्रमण विभागाची कारवाई होऊ शकते या कारणामुळे भयभीत आहेत. व्यापाऱ्यांवर अन्याय न होऊ देता हातावर पोट भरणाऱ्यांना देखील काँग्रेस संरक्षण देण्याचे काम करत आहे. अशा पद्धतीने दिवसाढवळ्या हफ्ता वसुली करणाऱ्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
Tags:
Ahmednagar
