। अहमदनगर । दि.17 नोव्हेंंबर ।एस.टी. महामंडळाच्या तारकपूर बसस्थानकावर रात्री मुक्कामी असलेल्या संगमनेर आगाराच्या बसमधून 35 लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी (दि.15) पहाटे घडली. याबाबत संगमनेर आगाराचे बसचालक कैलास तुकाराम जाधव (रा.सुकेवाडी, ता.संगमनेर, जि.अ.नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर आगारातून सोमवारी (दि.14) चालक कैलास जाधव व वाहक मारूती वाघुले हे (एम.एच.14 बी.टी.3522) बस घेऊन संगमनेर आगारातून 120 लिटर डिझेल भरून नाशिककडे निघाले होते. त्यानंतर नाशिकहन बस तारकपूर आगारात रात्री साडनऊ वाजण्याच्या सुमारास आली. मंगळवारी (दि.15) पहाटे 5.45 वाजता नाशिकला जायचे असल्याने चालक-वाहक यांनी बस तारकपूर आगारात उभी करून मुक्काम केला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी नाशिककडे निघताना बसची पाहणी केली असता डिझेल टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसले. त्यानंतर बसमधील 3500 रूपये किमतीचे डिझेल चोरीला गेल्याची चालकवाहक यांची खात्री झाल्याने त्यांनी फिर्याद दिली.