राज्यातील तीन शहरे आणि एका कटकमंडळाचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
। नवी दिल्ली । दि.30 सप्टेंबर 2022 । ‘स्वच्छ सर्वेक्षण -2022’ अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा तर कराड शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई महानगर पलिका आणि देवळाली कटक मंडळाचाही (कॅन्टॉनमेंट बोर्ड) राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज एकूण 23 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2022’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम 12 पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर आणि सचिव मनोज जोशी यावेळी उपस्थित होते.
