पोलिसांच्या अजेंड्यावर आता रोड रोमियो

नवरात्रोत्सावात पोलिसांची पथके लागली फिरू

पाचजणांना समज देऊन सोडले


। अहमदनगर । दि.29 सप्टेंबर 2022 । नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असल्याने या उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी व विविध कार्यक्रमासाठी घराबाहेर पडणार्‍या महिला व मुलींना त्रास देणार्‍या रोड रोमियोंचा बंदोबस्त पोलिसांच्या भरोसा सेलच्या दामिनी पथकाकडून केला जाणार आहे. गेल्या दोन दिवसात पाच रोड रोमियोंविरुध्द कारवाई करून त्यांना समज देण्यात आल्याची माहिती भरोसा सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी दिली.

सोमवारपासून भक्तीमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली. गेली दोन वर्षे करोनामुळे उत्सवाला मर्यादा होत्या. यंदा मात्र विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरात केडगाव, बुर्‍हाणनगर, एमआयडीसी, पाईपलाईन रोड येथील देवी मंदिरात मोठी गर्दी होत असते. मंदिरात दर्शनासाठी व गरबा खेळण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या महिला व मुलींना रोड रोमियोंकडून त्रास दिला जातो. 

यातून छेडछाडीच्या घटना घडत असतात. अशा रोड रोमियोंंचा बंदोबस्त करण्यासाठी भरोसा सेलचे पथक मंदिर परिसरात साध्या वेशात असणार आहे. तेथे असणार्‍या रोड रोमियोंवर पोलिसांची नजर असणार आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवसात भरोसा सेलच्या पथकाने महिला, मुलींना त्रास देणार्‍या पाच रोड रोमियोंना पकडून संबंधित पोलीस ठाण्यात आणले

व त्यांच्याविरुध्द प्रतिबंधक कारवाई करून त्यांना समज देवून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, साध्या वेशातील पोलिस पथकाने देवी मंदिरांच्या परिसरात गस्त करण्यासह नगर शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवरही सायंकाळच्यावेळी गस्त घालण्याची गरज आहे. अनेक चौकांतून रोड रोमियोंचे टोळके उभे असते व त्यांच्याकडून महिला व मुलींची छेडछाड होत असल्याने त्यांनाही वेसण घालण्याची मागणी होत आहे.

-------

💥  शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार 

💥  पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

💥 मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती 

Post a Comment

Previous Post Next Post