जन्मदात्यांनाच मारहाण; आईचा मृत्यू, वडील गंभीर

। अहमदनगर । दि.21 जून । जगभरात रविवारी फादर्स डे साजरा होत असताना शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे मुलाने फादर्स डेच्या पूर्वसंध्येला शनिवारी आईवडिलांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली. यात आईचा मृत्यू झाला तर वडिलांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

रविवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील रहिवासी असलेल्या त्रिंबक खेडकर यांना बाबासाहेब नावाचा एक मुलगा आणि केशरबाई ही मुलगी आहे.

शनिवारी (दि.19) त्रिंबक खेडकर हे पत्नी शिवबाई हिच्या समवेत घराच्या दारात बसलेले असताना बाबासाहेब याने अचानक त्यांना बेदम मारहाण करणे सुरू केले.  आई-वडिलांच्या ओरडण्याने शेजारी जमा झाले. बाबासाहेबने आई-वडिलांच्या पाठीवर, तोंडावर तसेच गालावर, डोक्यात लाकडी दांड्याने जबर फटके मारले.

यात दोघांनाही जबर मार लागला. शेजार्‍यांनी जखमी आईवडिलांना सुरुवातीस पाथर्डी येथे आणि नंतर अहमदनगर येथील रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान, आई शिवबाई यांचा मृत्यू झाला, तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Post a Comment

Previous Post Next Post