। अहमदनगर । दि.09 मे 2022। व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
आरोपींमध्ये विवाहितेचा पती अजय अशोक मुथीयान, सासू अलका अशोक मुथीयान (रा. कराचीवालानगर), नणंद शितल दीपक कुंकुलोळ (रा. कळंब जि. उस्मानाबाद), चुलत सासरे संपत रोकडचंद मुथीयान, चुलत दीर अतुल संपत मुथीयान, राहुल संपत मुथीयान (रा. टिळक रोड) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
फिर्यादी विवाहितेचे ४ जुलै २००६ रोजी अजय मुथीयान यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर १५ दिवसांपासून ते ४ मे २०२२ पर्यंत आरोपींनी वेळोवेळी व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली, असे पीडित विवाहितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी विवाहितेने सुरुवातीला भरोसा सेल येथे तक्रार दाखल केली होती. तेथे समेट न झाल्याने भरोसा सेलने तोफखाना पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.