लहान मुलीच्या खून प्रकरणातील आरोपी १० वर्षांनंतर झाला जेरबंद
। अहमदनगर । दि.22 मे 2022। जामखेड येथील लहान मुलीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीला दहा वर्षानंतर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. दादा महादेव मुटके असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सन २०१२ मध्ये ही घटना घडली होती.
जुन्या वादातून न्यायालयामध्ये खटला सुरू असताना फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. मात्र, ११ जुलै २०१२ रोजी लक्ष्मण फाळके, गौतम फाळके, नारायण फाळके, शिवदास फाळके, भरत फाळके, लखाबाई फाळके, शिवगंगा फाळके, शालन फाळके, मैना फाळके, शशिकला फाळके, दादा मुटके व जमना मुटके (सर्व बसरवाडी, शिऊर, ता. जामखेड) यांनी फिर्यादी
रामदास सुखदेव फाळके (वय ६०) यांची पत्नी जलदाबाई यांना मारहाण केली. त्यावेळी त्यांची नात संगीतालाही धारदार शस्त्राने गळ्यावर मारून खून केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी दादा महादेव मुटके हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, अमलदार सखाराम मोटे, भाऊसाहेब कुरुंद, विश्वास बेरड, मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, विजय ठोंबरे, संतोष लोढे, रवी सोनटक्के, यांच्या पथकाने दादा मुटके याला बसरवाडी येथे सापळा लावून अटक केली.