। अहमदनगर । दि.17 मे । कमी पेट्रोल दिल्याच्या संशयावरून औरंगाबाद रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी झाली. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसही दाखल झाले. मात्र, गुन्हा दाखल न करता परस्पर वाद मिटवून विषयावर पडदा घालण्यात आला.
या पेट्रोल पंपावर एका व्यक्तीने 100 रुपयांचे पेट्रोल दुचाकीमध्ये भरले. पेट्रोल कमी असल्याचा संशय दुचाकीस्वाराने व्यक्त केला. त्यावर पेट्रोल पंपावरील कर्मचार्याने गाडी बाजूला घेऊन पेट्रोल चेक करून घ्या, असे सांगितले. मात्र, दुचाकीस्वाराने ’सगळेच पंपवाले चोर आहेत’, असे म्हणत कमी पेट्रोल दिल्याचा आरोप केला. त्यामुळे चिडलेल्या कर्मचार्याची व दुचाकीस्वाराची वादावादी झाली.
त्याचे पर्यावसन दोघांच्या हाणामारीत झाले. त्यानंतर पंपावरील इतर कर्मचार्यांनीही संबंधित दुचाकीस्वाराला चोप दिला. पंपावरील इतर व्यक्तींनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस ठाण्यापर्यंत वाद गेला होता. मात्र, फिर्याद न घेता पोलिस ठाण्याच्या बाहेरच हा वाद मिटवून त्यावर पडदा घालण्यात आला. मात्र, या घटनेची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती.
Tags:
Crime