। अहमदनगर । दि.18 मे । अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच दोन दुर्मिळ प्रजातींच्या कुमुदिनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी फुलवण्यात निसर्गप्रेमींना यश आले आहे.यापैकी सर्वप्रथम राहुरी तालुक्यातील धामोरी या गावातील युवा निसर्गप्रेमी श्री. प्रतिम सुनिल ढगे यांनी आपल्या शेतात जगातील सर्वात मोठी मानली जाणारी कुमुदिनी व्हिक्टोरिया अॅमॅझाॅनिका अर्थात राजकमळ फुलवण्यात यश मिळवले.
ही कुमुदिनी फुलवण्यासाठी त्यांना भिंगार येथील जागतिक कुमुदिनी संशोधक शिक्षक श्री.जयराम सातपुते व आळंदी येथील कमळसंवर्धक श्री.सतिश गदिया यांचे मार्गदर्शन लाभले. झाडांची आवड असलेल्या प्रतिम ढगे यांनी आपल्या घरी विविध मसाल्यांची ,शोभेची व अत्यंत दुर्मिळ अशा झाडांची लागवड केलेली असुन त्यांच्या कडे अडेनिअम वनस्पतीच्या सुमारे 300 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. आता अॅमे झॉनिकाचाही समावेश झाला आहे.
व्हिक्टोरिया अॅमेझोनिका कुमुदिनीचा शोध १८०१ मध्ये बोलिव्हियामध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील उथळ पाण्यात लागला.हि कुमुदिनी त्याच्या प्रचंड गोलाकार पानांसाठी प्रसिद्ध आहे.याची काटेदार पाने १० फुट व्यासापर्यंत वाढतात त्यामुळे तिला वाढवण्यासाठी छोटा तलाव बनवावा लागतो.पानांवरील काटे वनस्पतीला शाकाहारी माशांपासून वाचवतात.या कुमुदिनीचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे फुल चंद्रप्रकाशाबरोबर राञी उमलते पण ४८ तासच टिकते. पहिल्या राञी ते पांढर्या रंगाचे तर दुसर्या राञी त्यावर गुलाबी छटा येते.राणी व्हिक्टोरियाच्या नावावरून या कुमुदिनीचे नामकरण केले गेलेअसुन फुलल्यावर त्याचा सुगंध सर्वञ पसरतो.
या अॅमॅझाॅनिका कुमुदिनीबरोबरच जगातील अतिशय दुर्मिळ मानली जाणारी ससिमाॅन्थाॅन नावाची कुमुदिनी भिंगार येथील जागतिक कुमुदिनी संशोधक शिक्षक श्री.जयराम सातपुते यांनी स्वत: आपल्या गच्चीवरील कमळबागेत फुलवली आहे.श्री.जयराम सातपुते यांच्या गच्चीवरील जलीयवनस्पतींच्या बागेत सुमारे २५० पेक्षा जास्त वैविध्यपुर्ण प्रजातींचे कमळ-कुमुदिनी असुन सहस्ञदल कमळाबरोबरच अतिशय दुर्मिळ वनस्पतींचे संकलन आहे. त्यात पिवळ्या धम्मक ससिमाॅन्थाॅन कुमुदिनीच्या फुलण्याने सुवर्ण झळाळी मिळाली आहे.
ससिमाॅन्थाॅन कुमुदिनी ही सर्व पिवळ्या रंगातील कुमुदिनींमध्ये जगातील सर्वात आकर्षक कुमुदिनी असुन या कुमुदिनीला इंटरनॅशनल वाॅटरगार्डनिंग सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेने २०२१ सालचा सर्वात आकर्षक कुमुदिनीचा पुरस्कारही दिलेला आहे.पिवळ्या धम्मक आकर्षक रंगाबरोबरच वर्षभर दररोज दिवसा बर्याचदा जोडीने फुलणारी, बहुपाकळ्या असलेली,मोठ्या आकाराची व अतिशय सुगंधी असलेली अशी ही कुमुदिनी आहे. ससिमाॅन्थाॅन या कुमुदिनीचे संशोधक थायलंड देशातील अरूण काॅब्काऊ हे असुन हि कुमुदिनी भारतदेशात आजपर्यंत अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडेच फुलली आहे.
या दोनही कुमुदिनी जगात अतिशय दुर्मिळप्रजातींच्या व अत्यंत आकर्षक मानल्या जात असुन भारताच्या व नगरजिल्ह्याच्या जैवविविधतेत भर घालणार्या ठरल्या आहेत.म्हणुनच श्री.प्रतिम ढगे व श्री.जयराम सातपुते या दोघांचे निसर्गप्रेमी वर्तुळातुन सर्वञ कौतुक होत आहे. सोबत छायाचिञे : धामोरी येथील श्री.प्रतिम यांच्याकडे फुललेली व्हिक्टोरिया अॅमॅझाॅनिका( राजकमळ) व भिंगार श्री.जयराम सातपुते यांच्याकडे फुललेले ससिमाॅन्थाॅन कुमुदिनी.

