। अहमदनगर । दि.14 मे । महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील बिजोत्पादन प्रकल्पाला माउ, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्था येथे झालेल्या 37 व्या वार्षिक बिजोत्पादन आढावा बैठकीत देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या बैठकीसाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे बियाणे विभागाचे सहायक निदेशक डॉ. डि.के. यादव, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार आणि भारत सरकारच्या बियाणे विभागाचे सचिव अश्विन कुमार उपस्थित होते.
संपूर्ण देशात एकूण 65 गुणवत्तापूर्ण बिजोत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांमधून महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बिजोत्पादन प्रकल्पाद्वारे तयार होणारे फुले बियाणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या व बिजोत्पादन कंपन्यांच्या पसंतीस उतरलेले असून, कांदा फुले समर्थ बियाण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन पिकाचे फुले संगम व फुले किमया या वाणांच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची पहिली पसंती असते.
विद्यापीठांमध्ये 27 पिकांच्या वाणांचे मूलभूत व पायाभूत बिजोत्पादन करून सदर बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, नॅशनल सीड कार्पोरेशन व बियाणे उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी गट यांना वेळेवर उपलब्ध करून दिले जाते. दरवर्षी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने तसेच महाराष्ट्र शासन यांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्ट प्रमाणे उच्च दर्जाचे मूलभूत व पायाभूत बियाणे वेळेवर तयार करून त्यांचा पुरवठा केला जातो. विद्यापीठातील सदरचा बिजोत्पादन कार्यक्रम हा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व दहा जिल्ह्यातील संशोधन केंद्र, कॉलेज प्रक्षेत्रावर राबविला जातो व सर्व संशोधन केंद्राचे या कामी मोलाचे सहकार्य मिळत असते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनाखाली प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे व कृषीविद्या विभागाचे प्रमुख डॉ. आनंद सोळंके, डॉ. चंद्रकांत साळुंखे, डॉ. कैलास गागरे, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच बियाणे विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी परिश्रमपूर्वक बिजोत्पादनाचे काम करत असतात. या सर्वांच्या परिश्रमामुळेच महात्मा फुले कृषि विद्यापीठास प्रथमच संपूर्ण देशात दर्जेदार बीजोत्पादन करणारे केंद्र म्हणून हा देश पातळीवरील सन्मान प्राप्त झाला आहे.
-----------
आषाढीपूर्वी वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी कार्यवाही करा