। अहमदनगर । दि.29 एप्रिल । एका अल्पवयीन मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी आशिष राजेश साबळे (वय 23, रा. कोठी रोड, नगर) व त्याचा मित्र शिवम राजू हारबा (वय 19, रा. गवळीवाडा, नगर) या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
अहमदनगर कॉलेजच्या प्रशासकीय इमारती समोर ही घटना घडली. आबान जुबेर शेख (वय 17, रा. गुलमोहोर रोड, सावेडी) असे जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. दि. 20 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता आबान शेख हा मुलगा अहमदनगर कॉलेजच्या प्रशासकीय इमारतीजवळून पायी जात असताना आशिष साबळे व शिवम हारबा यांनी काहीएक कारण नसताना
आबानच्या पाठीमागून येऊन लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या आबान शेख याला उपचारासाठी नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींना पोलिसांनी अटक केली.
Tags:
Crime
