विद्यार्थी करणार गावांतून सौर उर्जा वापराची जागृती
बॉस्को ग्रामीण विकास केंद्राने दिले प्रशिक्षण
। अहमदनगर । दि.29 एप्रिल । पारंपरिक ऊर्जा मानला जाणारा कोळसा, पेट्रोल व डिझेल आदी संपणारी गोष्ट असून, सौर ऊर्जा व पवन ऊर्जा व इतर अपारंपरिक ऊर्जा चिरकाल टिकणारी असल्याने त्याचा वापर वाढवण्याची जनजागृती विद्यार्थी ग्रामीण भागात करणार आहेत. येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेद्वारे महिनाभर युवकांना सौर ऊर्जा प्रकल्पाचे तांत्रिक ज्ञान देण्यात आले. आता हे युवक आपल्या गावी गेल्यावर ग्रामस्थांना सौर उर्जेचे महत्व पटवून सांगणार आहेत.
नगर-पुणे महामार्गावरील केडगावमध्ये असलेल्या बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज, स्थित एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी), भारतीय विकास ट्रस्ट (बीव्हीटी) व मंडळ मिशन यांच्यावतीने युवकांसाठी हरित कौशल्य विकास (जीएसडीपी)कार्यशाळानुकतीच झाली. शहरासह ग्रामीण भागातील घरात व शेतात सौरऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर वाढविण्याच्या उद्देशाने युवकांना यात तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.
अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देऊन प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला होता. या कार्यशाळेस महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील युवकांचा प्रतिसाद लाभला. प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवकांना प्रमाणपत्र व टूल किटचे वितरण करण्यात आले. यावेळी टेरीचे पदाधिकारी पल्लवी शुक्ला, पत्रकार सुधीर लंके, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दिअॅब्रिओ, सेल्कोचे शेखर शेट्टी, संतोष कुमार,
मंडला सोल्युशनचे संदीप कामत, जॉय डॅनियल, भारत विकास ट्रस्टचे मनोहर कारेगिरी आदींसह प्रशिक्षणार्थी युवक उपस्थित होते. सौर प्रकल्पावरील विद्युत बल्ब प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन प्रा. कांतीलाल पाटोळे यांनी केले. आभार फादर जॉर्ज यांनी मानले. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थी युवकांनी सोनेवाडी (ता. नगर) गावात पथनाट्यातून अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व सांगितले.
