गौतम हिरण खूनप्रकरणी अ‍ॅड.यादव यांची नियुक्ती



। अहमदनगर । दि.01 मार्च । श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण व खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईतीलफौजदारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे.

एक मार्च 2021 रोजी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारीपेठेतून पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दि. 7 मार्च 2021 रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर गौतम हिरण यांचा पैशासाठी अपहरण करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. 

यासंदर्भात अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक फेडरेशन व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांनी हे प्रकरण लावून धरले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी गुन्हेगारांना जेरबंद केले. या प्रकरणात एकंदर पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह खात्याने सरकार पक्षातर्फे न्यायालयीन काम पाहण्यासाठी अ‍ॅड.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post