आशा सेविकांनी जीवावर उदार होऊन, सेवाभावाने दिलेले योगदान समाज विसरणार नाही : अविनाश घुले

आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने
कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सन्मान


। अहमदनगर । दि.21 मार्च । कामगारांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालाच पाहिजे. आशा सेविकांनी मोठ्या धाडसाने गावातील वाडी-वस्तीवर जाऊन आरोग्य सेवा पोहचवली. पैशाला महत्त्व न देता, त्यांनी जीवावर उदार होऊन सेवाभावाने दिलेले योगदान समाज विसरणार नसल्याचे प्रतिपादन हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सन्मान करण्यात आला. मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतच्या सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात घुले बोलत होते.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, आयटकचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, लाल बावटा कामगार संघटनेचे सतीश पवार, भाकपच्या सहसचिव कॉ. भारती न्यालपेल्ली, प्रकल्प अधिकारी सुनिल गोसावी, शेवगाव तालुकाध्यक्ष संजय नांगरे, आशा संघटनेच्या कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात, सचिव मधुकर केकाण, गोविंद सांगळे आदी उपस्थित होते.

पुढे घुले म्हणाले की, अन्याय झाल्यास व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी संघटनेचे बळ महत्त्वाचे ठरते. ज्यांना तोटा होतो, ते संघटना फोडण्याचे काम करतात. व्यवस्थे विरोधात एकट्याने लढणे अशक्य असून, त्यासाठी संघटनेची गरज आहे. श्रमिकांच्या संघर्षातून हमाल पंचायत उभी राहिली आहे. त्यांचे प्रश्न सोडवायचे कार्य सतत सुरू आहे. आशा सेविकांनी केलेल्या कामाची निश्चित शासनस्तरावर दखल घेतली जाणार असून, शासन स्तरावर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

सुवर्णा थोरात यांनी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून दखल घेऊन अशा सेविकांच्या मानधनात वाढ झाली. मात्र या महागाईच्या काळात आशांना जीवन जगणे कठीण झाले असून, न्याय-हक्कासाठी कायद्याच्या चौकटीत राहून पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल गोसावी यांनी केले. आभार कॉ. भारती न्यालपेल्ली यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post