। अहमदनगर । दि.23 मार्च । आंतरराष्ट्रीय स्तरावरील युध्दजन्य परिस्थिती, विविध देशांवर लावण्यात आलेले निर्बंध, कच्च्या तेलाचे वाढलेले भाव, खतांच्या आयाती बाबतीत जागतिक वाहतूकी साठी येणार्या अडचणी यामुळे खरीप हंगाम 2022 मध्ये संभाव्य दरवाढ व खताची टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकर्यांनी संभाव्य दरवाढ व खताची टंचाई टाळण्यासाठी आवश्यक असणारी खते वेळेत खरेदी करून ठेवावीत,.असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अहमदनगर जिल्हयामध्ये खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने भात, बाजरी, तूर, मूग, उडिद, सोयाबिन, कापूस, मका इत्यादी पीके घेतली जातात. यासाठी जून महिन्यामध्ये खताची आवश्यकता असते.
आवश्यक खताच्या खरेदीसाठी शेतकरी मे महिन्यामध्येच पूर्वनियोजन करत असतात. ही बाब लक्षात घेऊन या पूर्व नियोजनासाठी रब्बी हंगाममधला शिल्लक खत साठयाची आवश्यकता भासते. या शिल्लक खतसाठ्यामुळे खरीप हंगामामध्ये खत तुटवडा होत नाही.
अहमदनगर जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 516.50 मि.मी. इतके असून मागील वर्षी 670.40 मि.मी. इतके पर्जन्यमान झाले होते. खरीप हंगामाकरीता असणारे सरासरी क्षेत्र 5 लाख पन्नास हजार 49 हेक्टर इतके आहे.
मागील वर्षी 8 लाख 9 हजार 13 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याचप्रमाणे 1 लाख 85 हजार 25 मे. टन खताचा शेतकर्यांनी वापर केला होता.
सद्यस्थितीत विचार केला असता, येणार्या खरीप हंगामासाठी 8 लाख 38 हजार 946 हेक्टर क्षेत्र पेरणीचे लक्षांक ठेवले असून त्याप्रमाणे 2 लाख 75 हजार 505 मे.टन खताची मागणी येण्याची शक्यता आहे.
यामध्ये प्रामुख्याने युरीया 1 लाख 10 हजार 823 मे.टन., एमओपी 16 हजार 878 मे.टन, डीएपी 28 हजार 368 मे.टन, संयुक्त खते 84 हजार 35 मे.टन, एसएसपी 35 हजार 400 मे. खतांचा समावेश आहे. रब्बी हंगामामधील शिल्लक खत साठा साधारणतः 62 हजार 599 मे. टन इतका आहे.
खतांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास 0241/2353693 या दूरूध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन ही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
खालील बातम्या देखील वाचा...
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना समर्पणासाठी आवाहन
बीएसएनएलचे स्टेशन तोडून नुकसान
युवतीला त्रास देणार्या युवकावर गुन्हा दाखल
रिक्षांचे खुले परवाने बंद करा...रिक्षा थांब्यांवरील अतिक्रमणे हटवा
Tags:
Ahmednagar
