रिक्षांचे खुले परवाने बंद करा...रिक्षा थांब्यांवरील अतिक्रमणे हटवा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने
। अहमदनगर । दि.23 मार्च । अहमदनगर शहरामध्ये ऑटोरिक्षांची संख्या फार मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सरकारने खुले परवाने बंद करावे. तसेच नगर शहरामध्ये रिक्षांसाठी नवीन नवीन थांबे द्यावेत व रिक्षा थांब्यांवरील अतिक्रमणे काढावीत, अशी मागण्या महाराष्ट्र राज्य ऑटोरिक्षा संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत मांडल्या.
ऑटो रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व प्रमुख सल्लागार विलास कराळे, सचिव अशोक औशीकर, सहचिटणीस लतीफ शेख, राजू टिपरे, विजय चौधरी, अर्षद सय्यद, नासिर खान, सागर लांडे, राहुल बेरड, अशोक वैरागर, फारुक शेख, मुन्ना शेख, राजू काळे, अन्वर शेख, निसार शेख, समीर शेख, सुनील खरपे, दिलीप गिरी, संतोष गायकवाड, लक्षिमन ढगे, गणेश आटोळे, प्रकाश गोसावी, निलेश कांबळे, सोपान दळवी आदीसह रिक्षाचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी गेली कित्येक वर्षापासून महाराष्ट्र राज्य ऑटोरिक्षा संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, सचिव नितीन पवार व महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालक मालक व महाराष्ट्रातील रिक्षा संघटनांनी महाराष्ट्र सरकारपुढे रिक्षा चालकांचे विविध प्रश्न आंदोलनाच्या मार्गाने व निवेदने देऊन मांडलेले आहेत. पण सरकार रिक्षा चालकांना उदध्वस्त करायचे निर्णय घेत आहे, असा आरोप संघटनेचा आहे. त्याच्या निषेधार्थ येथे आंदोलन करण्यात आले.
केंद्रसरकारने नवीन मोटार व्हेईकल कायदा केलेला आहे. त्यामध्ये सरकारने फार मोठ्या दंडाची तरतूद केली आहे. ती केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी, राज्य सरकारने ऑटोरिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करून ताबडतोब कामकाज चालू करावे व केंद्रसरकारने मोटार व्हेईकलच्या इन्शुरन्समध्ये जी वाढ केली आहे, ती रिक्षाचालकांसाठी नाममात्र असावी, कारण रिक्षाचालकांना रिटर्न एक टक्का सुद्धा फायदा मिळत नाही, या मागण्या आंदोलनाच्यावेळी करण्यात आल्या.
