। मुंबई । दि.02 मार्च । एका भारतीय विद्यार्थ्यांचा रशियन सैन्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी मंगळवारी समोर आली होती. यामधुन पालकांची काळजी वाढली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करुन केद्र सरकारला परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याचा सल्ला दिला आहे.
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे. युक्रेनच्या शहरावर रशियन सैन्य ताबा मिळवत जात असून अधिक आक्रमक होत चालले आहे. या युद्धात अनेक युक्रेन नागरिक देश सोडून जात आहेत. तर शिक्षणासाठी युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेले अनेक भारतीय विद्यार्थी कीवमध्ये अडकले आहेत.
युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या विद्यार्थ्याच्या आणि कुटुंबीयाप्रती शरद पवार यांनी संवेदना व्यक्त केल्या. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखारप्पा यास श्रद्धाजंली अर्पण करतो. सध्या युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.
त्यांच्यावर प्रचंड तणाव आहे. काहींना जेवणही मिळेना झालंय. परिस्थितीचे गांभीर्य ओळखावं आणि युक्रेनमध्ये अकडलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची निराशा आणि काळजी समजून घ्यावी, अशी माझी केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती आहे.