। मुंबई । दि.20 फेबु्रवारी । कोणतीही राजकीय अस्पृश्यता न बाळगता देशातील समविचारी पक्षांची मोट बांधणे आवश्यक आहे. केंद्रातील अन्यायी सरकारच्या विरोधात एकसंघ होऊन लढण्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी याची गरज असल्याचं सांगत, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.
देशामध्ये सध्या सुरू असलेल्या अनेक समस्या छोट्या पक्षांना दाबण्याचा चाललेला प्रयत्न त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही अशा राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दिला जाणारा त्रास याविरोधात एकसंघ लढण्याची गरज केसीआर यांनी मुंबईत व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना हैदराबादला येण्याचा आमंत्रण दिलं.
देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी तयारी सुरू असल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी स्वरूप या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना या आघाडीमध्ये सामील होण्याची विनंती केली.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महत्त्वाच्या पक्षांनी केसीआर यांच्या भूमिकेला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता भविष्यात कशा पद्धतीने विरोधी पक्ष एकत्र येतात याची उत्सुकता असणार आहे.