। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । अनावश्यक राजकीय गप्पा बंद केल्या पाहिजेत. धर्म ही सार्वजनिक बाब नसुन घरातली बाब आहे. जाती धर्माच्या संघर्षाच्या सार्वजनिक गप्पा बंद केल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांचे विचार कामामधुन जिवंत ठेवा. मानवतावादी संस्कृती जपा. सध्या प्रचंड बेरोजगारी आहे.
ढासळलेले अर्थकारण बदलायचे असेल तर तरुणांनी राजकारण, धर्म यामध्ये गुरफटून न पडता उद्योग उभे केले पाहिजेत, युवकांनी विचारांमध्ये बदल केला पाहिजे असे प्रतिपादन मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केले.
शिवजयंतीनिमित्ताने रोजगार व उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी मराठा सेवा संघ, जामखेड, जिव्हाळा फाऊंडेशन व संभाजी ब्रिगेडच्या वतीने बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. यावेळी बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी,
प्रा.मधुकर राळेभात, सभापती सूर्यकांत मोरे, पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड, दत्तात्रय वारे, राहुल उगले, अशोक कुटे, गुलाबशेठ जांभळे, विनायक राऊत, खलील मौलाना, जावेदसय्यद, प्रा.विकी घायडक, नामदेव राळेभात, संदिप बोराटे, अॅड.हर्षल डोके, नगरसेवक पवन राळेभात, सौ.वर्षा पवार, सौ.विजया नलवडे, राधिका राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रविण गायकवाड म्हणाले की, येणाराकाळ संघर्षाचा आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने आर्थिक सक्षम असणं काळाची गरज आहे. फक्त आधुनिकतेच्या गप्पा व शिवाजी महाराजांचा जयजयकार करुन चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर त्यातील प्रत्येक गोष्ट आजही प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक क्षेत्रातील लोकांना मार्गदर्शक आहे.
शिवाजी महाराजांच्या अहदतंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपला आज जागतिकीकरणाच्या धर्तीवर अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला यावर सविस्तर माहिती देतांना तरुणांनी जगाकडे व्यवसायिक व्यापक नजरेने बघण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी डॉ.महेंद्र शिंदे, महेश कडुस, आबासाहेब शिंदे, संतोष पवार, अरुण निमसे यांनी अर्थार्जन, उद्योग या विषयावर उदाहरणादाखल मार्गदर्शन केले. प्रथमच उद्योगाबाबत माहिती देणार्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार, तालुकाध्यक्ष कुंडल राळेभात यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचलन राम निकम यांनी केले तर आभार प्रा.शहाजी डाके यांनी मानले.
महाराष्ट्रातील मुलांच्या मनात काम करण्याची ओढ कमी असुन अगदी शेतात काम करण्यासाठी देखील बिहारी लोक आहेत. कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊन मुळे अनेक लोकांच्या नौकर्या गेल्या.दुकांनदारांनी दुकानातील कामगारांची संख्या कमी केली. खुप मोठा समाज बेकारीच्या खाईत गेला. या सर्व परिस्थितीतून सावरताना तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळणे खूप आवश्यक आहे.जाळपोळ-मारामारी, दंगे यात वेळ घालवण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.त्यासाठी आपण आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. प्रविण दादांनी खुपच चांगला निर्णय घेतला असून तोडण्या-फोडण्या बरोबरच बिझनेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड जोडण्याचं देखील कार्य करत आहे.
- सौ.सुनंदाताई पवार
(विश्वस्त,बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट)