पैशांसाठी मित्राचा निर्घृण खून करणारा ठरला दोषी


। अहमदनगर । दि.11 फेब्रुवारी । पैशासाठी मित्राचा खून करणार्‍या आरोपीला येथील न्यायालयाने दोषी धरीत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी आरोपीस जन्मठेपेची व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अमित बाबुराव खामकर (वय 28, रा. क्रांती चौक, सुतार गल्ली, केडगाव, नगर) याचा यामध्ये समावेश आहे. आरोपी अमित याने राहुल भागवत निमसे यास जीवे ठार मारले होते.

28 जून 2018 रोजी राहुल निमसे या युवकाचा मृतदेह आढळला होता. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाना बेडशीटमध्ये त्याचा मृतदेह गुंडाळून अरणगाव शिवारात टाकलेला होता. याप्रकरणी त्याच्या मोठ्या भावाने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा राहुलचा मित्र अमित खामकर याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी या गुन्ह्याचा तपास करून अमित खामकर याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. खामकर याने राहुलच्या खिशातील ए. टी. एम कार्ड काढून केडगाव येथील एका एटीएम सेंटरमधून 40 हजार रुपये रक्कम काढली. त्यानंतर अमित याने माणिक चौकातील एका दुकानातून मोबाइल व एक सीमकार्ड विकत घेतले. तसा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता.

या खटल्यात जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी 15 साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी, मृताचे शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी, घटनेच्या काही वेळ आधी अतुल व राहुल यांना एकत्र पाहणारा साक्षीदार, आदींचा समावेश होता. खटल्यातील साक्षी-पुरावा,

परिस्थितीजन्य पुरावा आणि अ‍ॅड. सतीश पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवण्यात आले. खून केल्याबद्दल जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 5 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, अशी पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार भानुदास बांदल यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post