। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी । राज्यातल्या मविआ सरकारमधल्या अनेक नेते आणि मंत्र्यांवर ईडीचे धाडसत्र अद्याप सुरु आहे. सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील मविआतले ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची १३ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली असून मालमत्तेची किंमत साधारण १३ कोटी ४१ लाख असल्याचे दिसून येत आहे.
ईडीने संबंधित कारखान्याबाबत चौकशी करण्यास यापूर्वीच सुरुवात केली होती. २०२१ मध्ये याबाबत तनपुरे यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. यामुळे आता त्यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करण्यात आली आहे.
राज्य सरकारमधील 12 पेक्षा जास्त मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या आठवड्यात नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे. तर अनिल देशमुख काही महिन्यापासून अटकेत आहे. अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांमागे सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू आहे. त्यात आता प्राजक्त तनपुरेंचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.