। अहमदनगर । दि.29 जानेवारी । जामखेड पोलिस स्टेशन येथे कृषीपंपांच्या चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या बाबत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत होते. याप्रकरणी आरोपीला जेरबंद करून चार विद्युत पंप जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान २० जानेवारी रोजी हा गुन्हा बाबा दयानंद खाडे याने केला, अशी माहिती मिळाली. यावरून बाबा दयानंद खाडे, (वय २१, रा. बाळगव्हाण शिवार) याचा त्याच्या गावात व मित्राकडे शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.
जामखेड पोलिस स्टेशनला आणून त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. हा गुन्हा करतेवेळी भाऊ योगेश खाडे व आरोपी बाबा खाडे याचा अल्पवयीन मित्र हे त्याचे साथीदार असल्याचे सांगितले. बाबा खाडे व त्याचा अल्पवयीन मित्राकडून गुन्ह्यातील मुद्देमाल ४ कृषीपंप हस्तगत केले.