एसटी महामंडळाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जावर वांद्रे येथील कामगार न्यायालयात आज सुनावणी झाली. एसटीची सेवा ही लोकोपयोगी सेवेत मोडत असल्याने सहा आठवडयाआधी संपाची नोटीस देणे गरजेचे असल्याचे मत कामगार न्यायालयाने मांडत एसटीचा संप बेकायदेशीर ठरविला आहे.
त्यामुळे एसटी कामगारांवर एक दिवसाच्या संपाच्या बदल्यात आठ दिवसांचा पगाराची रक्कम दंड म्हणून आकारणे आणि तत्सम शिस्त व आवेदनाच्या कारवाया करण्यास महामंडळाला मोकळीस मिळाली आहे.
एसटी प्रशासनाच्या याचिकेवर अंतिम निकाल देण्यापूर्वी न्यायालयाने सर्व संघटनांचे मत जाणून घेतले. एसटी कामगार संघटनांनी सध्या सुरू असलेल्या संपाशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.
आतापर्यंत 3,862 कर्मचारी बडतर्फ
एसटी महामंडळाने आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्ती केली आहे. तर सोमवारी महामंडळाने 304 कर्मचाऱयांना बडतर्फ केले असून एकूण बडतर्फ कर्मचाऱयांची संख्या 3,862 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 11,024 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच 6,029 कर्मचाऱयांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Tags:
Breaking