। अहमदनगर । दि.23 जानेवारी । मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. विक्वी उर्फ विकास विजय शिंदे (वय 23, रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेप्रमाणे उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापू फोलाणे, भीमराज खर्से, देवेंद्र शेलार, रविकिरण सोनटक्के यांच्या पथकाने श्रीरामपूर परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद केले.
एमआयडीसीमधील झेन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील सुरक्षा रक्षकांना मारहाण करून कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच कंपनीचे शटर कटावणीने तोडून कंपनीतील 17 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपर पट्ट्यांचे 10 बॉक्स चोरून नेले होते.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून चार सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिस उपमहानिरीक्षकांच्या आदेशान्वये नमूद गुन्ह्यातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियमप्रमाणे वाढीव
कलम लावण्यात आले असून आरोपी विक्की उर्फ विकास शिंदे हाफरार होता. पोलिस निरीक्षक कटके यांनी शिंदे याचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर परिसरातून शिंदे यास ताब्यात घेतले.