आबांचे गुण आत्मसात करुन रोहितने काम केले : बहीण स्मिता पाटील यांच्याकडून रोहित पाटलांचे कौतुक


 सांगली । दि.19 जानेवारी । सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. रोहितने आपल्या पहिल्याच निवडणुकीत बाजी मारल्याने त्यांच्यावर पक्षाच्या नेत्याकडून आणि कुटुंबियांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच  बहीण स्मिता पाटील यांनीही रोहितच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आर. आर पाटील यांच्या आठवणींना उजाळाही दिला.

या निवडणुकीसाठी रोहितने जीवाचे रान केले होते. रोहितविरोधात सर्वपक्षीय आघाडी असूनही त्याने अभूतपुर्व यश मिळविले. आबांची वकृत्वशैली, सर्वसामान्य जनतेतील वावर, नेतृत्व घडण्यासाठी आवश्यक गोष्टी आबांच्या माध्यमातून आत्मसात करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. भविष्यातही त्याला त्याचा फायदा होईल. या निवडणुकीसाठीही रोहितने त्याच पद्धतीने काम केले. त्यामुळे रोहितला जनतेने साथ दिली.

सर्वसामान्य जनता नेहमीच आमच्या पाठिशी उभी राहिली आहे. आम्हाला रोहित जिंकणार याबाबत पूर्ण खात्री होती. त्याचं वयही अतिशय कमी आहे. पण रोहितचं काम अतिशय चांगलं होतं. कोरोना काळात त्याने जनतेच्या अनेक समस्या सोडविल्या. ज्येष्ठ नेत्यांना भेटून, त्यांचे मार्गदर्शन घेत त्याने कामे केली आहे . कवठेमहांकळमध्ये त्याने खूप काम केलं आहे. त्याचेच त्याला फळ मिळाले, असे स्मिता पाटील यांनी म्हणाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post