। अहमदनगर । दि.18 नोव्हेंबर । महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरूग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम चालणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली.
या मोहिमेत झोपडपट्टी, वृद्धाश्रम, बांधकाम स्थळावरील कामगार, अनाथालय, रेस्टॉरंटमधील कर्मचारी, कारागृहातील कैदी, निर्वासितांची छावणी, रात्रीची आश्रयस्थाने, एचआयव्ही अतिजोखीम गट, बेघर, रस्त्यावरची मुले, निराधार घरे आदी ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. 30 आशा वर्कर व 26 स्वयंसेवकांमार्फत प्रत्यक्ष गृहभेटी देऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये 40 हजार नागरिकांच्या तपासणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
ज्यांना दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवडण्यांपेक्षा जास्त काळ ताप, मागील तीन महिन्यांत वजनात लक्षणीय घट, मागील सहा महिन्यात थुंकीवाटे रक्त पडणे, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे अशा क्षयरूग्ण असलेल्या घरातील व्यक्तींना वरील लक्षणे असल्यास त्यांचा थुंकी नमुना घेणे आवश्यक आहे.
तसेच मधुमेह, एचआयव्ही बाधितांना एक दिवसाचा खोकला किंवा ताप असल्यास क्षयरोगाची तपासणी करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र, नवी पेठ दवाखाना, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टॉन्मेंट हॉस्पिटल, निदान डायग्नोस्टिक सोनोग्राफी अॅँड एक्सरे क्लिनिक, सिव्हील हॉस्पीटल येथे मोफत छातीचा एक्स-रे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. राजूरकर यांनी केले आहे.
तपासणी अंती क्षयरोग निदान झालेल्या रुग्णांना मनपाची 7 नागरी आरोग्य केंद्र, जवळचे खासगी डॉक्टर, अंगणवाडी या ठिकाणी मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.