। अहमदनगर । दि.17 नोव्हेंबर । नगरकरांसाठी साहित्याची मेजवानी म्हणून दिवाळी अंक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेले आहे यामध्ये विविध प्रकारच्या दिवाळी अंकांचा समावेश आहे त्यात आरोग्य, बाल साहित्य, ऐतिहासिक, ललित साहित्य, विनोदी यांसारख्या विविध विषयांच्या 125 दिवाळी अंकांचा समावेश आहे.
या दिवाळी अंकांचा नगरकरांनी वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री. सचिन जोपूळे यांनी केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आयोजित दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी त्यांनी दिवाळी अंकाचा पार्श्वभूमी चा आढावा घेतला.
अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक व्ही. आर, यंदे उपस्थित होते. त्यांनी दिवाळी अंकांचा स्तुत्य उपक्रम असून या दिवाळी अंकाचा रसिक वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले, प्रास्ताविकामध्ये श्री गाडेकर यांनी हे प्रदर्शन 30 नोव्हेंबर पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून साडेदहा ते साडेपाच या वेळेमध्ये सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले, आभारप्रदर्शन तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले, याप्रसंगी दिपा नीसळ वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप नन्नवरे, अहमदनगर जिल्हा वाचणालयाचे नितीन भारताल, शैलेश घेगडमल, राजेंद्र शिंदे, वसंत कर्डिले आदीसह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.