आता तरी आमच्या कोविड नियुक्त्या रद्द करा हो... : प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

। अहमदनगर । दि.12 ऑक्टोबर । शाळा आता सुरु झालेल्या असताना माध्यमिक शिक्षकांच्या कोविड कामाच्या नियुक्त्या रद्द कराव्या, अशी मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे. या मागणीचे निवेदन गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

राज्यासह जिल्ह्यात माध्यमिक शाळा सुरु झाल्या असल्याने माध्यमिक शिक्षकांचे अध्यापनाचे कार्य सुरु झाले आहे. तरी देखील माध्यमिक शिक्षकांना देण्यात आलेल्या कोविड ऑनलाईन डाटा एन्ट्रीच्या कामाच्या नियुक्त्या अजूनही कायम आहेत. या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली. 

या मागणीचे निवेदन नगर तालुका पंचायत समिती येथे गट शिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, गटविकास अधिकारी सौ. होजगे यांना देण्यात आले. यावेळी शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, रोहिदास पुंड, अय्याज शेख, दिनकर मुळे, मदन गांगर्डे, जगन्नाथ नारळे, वैभव हिंगे, युवराज बळे, बबन शिंदे, बी.टी. टकले, बद्रीनाथ शिंदे, विजय धेंडे, मुरलीधर तनपुरे, दादाराम हजारे, बाळासाहेब वांढेकर, अशोक लष्कर, अंकुश बर्डे आदींसह माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.

6 ऑक्टोबरपासून माध्यमिक शिक्षकांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या ऑनलाइन डाटा एन्ट्री कामासाठी नियुक्त्या केलेल्या आहेत. राज्यासह जिल्ह्यात 4 ऑक्टोबरपासून सर्व माध्यमिक शाळांचे इयत्ता पाचवी ते बारावी वर्गाचे अध्यापनाचे काम सुरू झालेले आहे. शासनाने माध्यमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. या अगोदर माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी देखील माध्यमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना केलेल्या असताना देखील माध्यमिक शिक्षकांना हे काम देण्यात आले आहे. 

जिल्ह्यात इतर तालुक्यामध्ये सर्व माध्यमिक शिक्षकांना कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. नगर तालुक्यात मात्र कोरोनाच्या कामकाजासाठी माध्यमिक शिक्षक नेमलेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना देण्यात आलेल्या कोविड ऑनलाईन डाटा एन्ट्रीच्या कामाच्या नियुक्त्या तातडीने रद्द करण्याची गरज आहे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण : कोरोनाच्या भीतीनंतर विद्यार्थी हळहळू शाळेत येत आहे. मात्र, माध्यमिक शिक्षकांची कोरोनाच्या कामासाठी नियुक्ती केल्याचे समजल्यानंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. अध्यापनाचे काम करुन कोरोनाचे काम करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने धोकादायक असल्याने संतप्त शिक्षकांनी गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना धारेवर धरले. यावेळी संदीप गुंड यांनी मध्यस्थी करुन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी प्रशासनाला केली. यावर गट शिक्षणाधिकारी यांनी नगर तालुक्यात माध्यमिक शिक्षकांना ऑनलाईन डाटा एन्ट्री कामाच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post