भगव्या ध्वजाचे राजकारण करणार नाही अन् करून देणार नाही : आमदार रोहित पवार

। अहमदनगर/जामखेड । दि.15 ऑक्टोबर ।  खर्डा येथे उभारण्यात आलेला भारतातील सर्वात उंच स्वराज ध्वज हा पक्षाचा नाही. राज्यातील जनतेचा आहे. या भगव्या ध्वजाचे राजकारण मी करणार नाही आणि होऊ देणार नाही. मात्र जे राजकारण करेल ते विकासाचे राजकारण असेल, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंच झेंडा भगवा 'स्वराज्य ध्वज' आज  विजयादशमीच्या मुहूर्तावर उभारण्यात आला.

स्वराज्य ध्वज यात्रेचा प्रवास नऊ सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत झाला. १२ हजार किलोमीटरचा हा प्रवास होता. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, देशातील सहा राज्यांचा प्रवास करत हा ध्वज आज खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यासमोर फडकविण्यात आला.

यावेळी राजेंद्र पवार, सुनंदा पवार, अखिल भारतीय वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश महाजन बोधले, शिक्षण क्षेत्रातील तंज्ञ डिजिटल शिक्षक डिसले, कलावंत मंगला बनसोडे, अनुराधा गोरे, अवधूत गांधी आदी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी स्वराज्य व भगव्या ध्वजाबाबत आपले विचार मांडत जात व धर्मावर राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीकास्र सोडले.

आमदार पवार म्हणाले, एकता व समानतेच्या विचाराने जातीभेद व धर्मभेद विसरून आपण येथे स्वराज्य ध्वजाला मानवंदना देण्यासाठी आलो आहोत. काहीजण स्वराज्याच्या भगवा ध्वजाचा वापर ठराविक जाती अथवा धर्मापूर्ता करून जाती धर्मात विभाजन करत आहेत. जाती व धर्म भेदातून काहींना फायदा होतो म्हणून ते असे करतात, असे ते म्हणाले.

ध्वजाची संकल्पना भारतीय संस्कृतीतून : आपल्या महाराष्ट्राची शान असणा-या सामान्य कुटुंबातील असामान्य ताकद आणि कर्तृत्व दाखवणा-या लोकांनाच आम्ही आज पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यामागे त्यांच्याकडून युवावर्गाने प्रेरणा घ्यावी हाच हेतू असल्याचंही पवार म्हणाले. स्वराज्य ध्वजाची प्रेरणा आपल्याला भारतीय संस्कृतीतूनच मिळाल्याचं सांगत ते म्हणाले, तहानलेल्याला जात-पात न विचारता त्याला पाणी देतो, भूक लागणा-यांना जेवण देतो. ही आपली संस्कृती आहे. लहान मुलाला सतरा कोटीच्या इंजेक्शनची गरज लागली त्यावेळेस कोणी दहा कोणी शंभर रुपये जमा केले आणि त्या बाळाचा जीव वाचवायला धडपड केली. वाढदिवसानिमित्त अनेक जण रक्तदान करतात. रक्तदान करताना कोणताही विचार मनामध्ये न ठेवता फक्त एकच विचार असतो की त्याने कोणाचा तरी जीव वाचवावा. ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि याचं प्रतीक हा स्वराज्य ध्वज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post