अहिल्यानगर महापालिका ‘एमओएच’मध्ये राज्यात द्वितीय!

अहिल्यानगर महापालिका ‘एमओएच’मध्ये राज्यात द्वितीय!
 

। अहिल्यानगर । दि.01 सप्टेंबर 2026 । महापालिकेने सार्वजनिक आरोग्य सेवेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्याच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी (एमओएच) रँकिंगमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राज्य कार्यालयाकडून जून 2026 च्या पहिल्या तिमाहीसाठी जाहीर झालेल्या या क्रमवारीत राज्यातील 29 महापालिकांमध्ये अहिल्यानगरने हे यश मिळवले आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्य आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांचा सत्कार करण्यात आला.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून विविध आरोग्य सेवा, उपक्रम आणि पोर्टलवरील मासिक नोंदींच्या आधारे दर महिन्याला महापालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व सिव्हिल सर्जन यांचे स्वतंत्र रँकिंग केले जाते. यामध्ये माता व बाल आरोग्य, गरोदर मातांची नोंदणी, लसीकरण, नवजात बालकांची काळजी, कुटुंब नियोजन व नसबंदी सेवांचा सविस्तर आढावा घेतला जातो. 
 
तसेच, असंसर्गजन्य आजारांची नोंदणी व उपचार, क्षयरोग मुक्तीसाठी राबवले जाणारे अभियान, कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व आपला दवाखाना येथील ओपीडी सेवा, आणि आरोग्यवर्धिनी समित्यांच्या बैठका व त्यांचे अनुपालन या सर्व निकषांवर प्रभावी कामकाज केल्यामुळे हे मानांकन प्राप्त झाले आहे.

आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, शहरात आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्यांना सातत्याने सूचना देऊन नवनवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमधून नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध केली जात आहे. येत्या काळात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महापालिका अधिक चांगल्या उपाययोजना राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post