लाच मागणारा ग्रामसेवक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

। अहमदनगर । दि.12 ऑक्टोबर । लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 25 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी ग्रामसेवक चंद्रकांत तुकाराम पाटील (वय 42 वर्षे याला रंगेहात पकडले आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी दहेगाव (मनमाड) ता. चांदवड येथे घरकुल योजनेअंतर्गत बांधलेल्या घराचा काही भाग अतिक्रमणात असल्यासंबंधाने तक्रारदार यांच्या विरुद्ध दिवाणी दावा दाखल होता. त्यामुळे तक्रारदार यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदवड यांना वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल मिळण्यास विनंती केली होती.

त्याकरिता गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना सदरचा अहवाल तयार करण्यास प्राधिकृत केले असता सदरचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने तयार करून देण्याकरिता ग्रामसेवकाने  25 हजारांची लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्रामसेवक चंद्रकांत तुकाराम पाटील ( वय. 42 वर्षे, ग्रामसेवक, दहेगाव(मनमाड) ता. चांदवड ता. नाशिक, रा. सुंदरबन अपार्टमेंट, उपनगर, नाशिक रोड, नाशिक) यास लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे.

ही कारवाई नाशिकचे लाच लुचतप प्रतिबंधक विभागाचे  पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक नाशिकचे सतीष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलिस हेड कान्स्टेबल सुखदेव मुरकुटे, पंकज पळशीकर, संतोष गांगर्डे, पोना मनोज पाटील, प्रवीण महाजन, प्रकाश महाजन यांनी केली.

आवाहन : सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी  केल्यास तात्काळ संपर्क साधावा. संपर्क क्रमांक : नाशिक कार्यालय दूरध्वनी क्रमांक :  0253- 2578230, टोल फ्रि क्रं. 1064.

Post a Comment

Previous Post Next Post