शनीदेवगावला वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू

। अहमदनगर । दि.12 ऑक्टोबर । श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या शनिदेवगाव येथील अशोक बाळा मेघळे यांच्या घराजवळील शेतात शनिवारी (9 ऑक्टोबर) दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीज पडून दोन बैल व एक गाय ठार झाले.

मेघळे यांची घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील मराठी शाळेच्या पाठीमागे शेती आहे. वैजापूर तालुक्यातील शनि देवगाव शिवारात माध्यमिक विद्यालयाशेजारी मेघळे यांची वस्ती असून हायस्कूलजवळील लिंबाखाली तीनही जनावरे पावसात आश्रयास होती. घटनास्थळाजवळच मुलगा गणेश मेघळे पत्र्याच्या पडवीत होता. दिवसभर कोरडे वातावरण होते. दुपारी अचानक बदल होऊन सोसाट्याच्या वार्‍यासह विजांचा कडकडाट व पाऊस सुरु झाला. पावसातच दुपारी तीन वाजता झाडावर वीज पडून दोन बैल व एक गाय हे मृत्युमुखी पडले. सुदैवाने मानवहानी झाली नाही.

मेघळे यांना काही दिवसापूर्वी बैलजोडी एका व्यापार्‍याने पंच्चाहत्तर हजारांना मागितली होती, परंतु त्यांनी आपल्या सर्जा-राजावर असलेल्या प्रेमापोटी नकार दिला होता. या घटनेमुळे मेघळे यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. घटनेची खबर वैजापूर तहसीलदार यांना देण्यात आली असून सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच असल्याने उशीरापर्यंत पंचनामास्थळी महसूल अधिकारी व शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी पोहचले नव्हते. दरम्यान, अचानक वादळी वारे व मुसळधार पावसामुळे परिसरात झाडे उन्मळून पडली तर ऊस पिके भुईसपाट झाली.

Post a Comment

Previous Post Next Post