बनावट विदेशी दारूसाठा जप्त
1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघा जणांवर गुन्हा दाखल
। अहिल्यानगर । दि.03 सप्टेंबर 2026 । नगर-पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी येथे ‘एलसीबी’ने छापा टाकून बनावट विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत1 लाख 75 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट लेबल लावलेली दारू ही आलिशा मंझील, महेशनगर, बाराबाभळी येथे पहिल्या मजल्यावरील खोलीत ठेवलेली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, विजय बलेश्वरसिंह कौशीक (वय 46, रा. विजयनगर, भिंगार) हा मिळून आला. त्याने सदरचे घर भाड्याने घेतल्याचे सांगितले.
पंचासमक्ष घरझडती घेतली असता घरामध्ये विदेशी दारू मिळून आली. बाटलीवरील लेबलवर किंमत, बॅच नंबर व उत्पादन तारीख दिसून आली नाही. दारूच्या बाटल्यावर बनावट लेबल लावल्याची खात्री पटल्याने विजय कौशीक यास ताब्यात घेऊन, त्याच्या कब्जातून 1 लाख 75 रूपये किंमतीच्या स्मूथ व्हिस्की कंपनीच्या 750 मिलीच्या 175 बाटल्या तसेच एक मोबाईल, असा एकुण 1 लाख 85 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करता त्याने सदरचा मुद्देमाल त्याचा साथीदार संदिप सानप (रा.मेहकरी, ता.अहिल्यानगर) याच्याकडून घेतल्याची माहिती सांगितली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भोये, पोलीस अंमलदार संदिप पवार, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, सुनिता पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे..
