सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणाची भामट्यांनी बॅग पळविली

। अहमदनगर । दि.23 सप्टेंबर । सैन्यदलात भरती होण्यासाठी नगर शहरात आलेल्या परप्रांतीय तरुणाची कागदपत्रे व पैसे ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.22) पहाटे नगर-औरंगाबाद रोडवरील पावन गणपती मंदिरासमोर घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  किसन सुहाचंद्र चौधरी (वय 18, रा.मथुरा, उत्तरप्रदेश) या युवकाने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किसन चौधरी हा सैन्यदलात भरती होण्यासाठी नगर शहरात आला होता. नगर-औरंगाबाद रोडवर असलेल्या बीटीआर येथे ही भरती प्रक्रिया होणार असल्याने तो महापालिके शेजारील पावन गणेश मंदिरात मित्रांसमवेत मुक्कामाला थांबला होता.

मंगळवारी (दि.21) तो इतर तरुणांसमवेत झोपलेला असताना बुधवारी (दि.22) पहाटे 1 ते 4.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याच्या उशाला ठेवलेली बॅग चोरुन नेली. या बॅगमध्ये विवो कंपनीचा मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड, 10वीचे सर्टीफिकेट, एटीएम कार्ड अशी कागदपत्रे व काही रोख रक्कम ठेवलेली होती. या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post