। अहमदनगर । दि.29 सप्टेंबर । ओढून-ताणून ईडी, सीबीआयचा वापर करून गुन्हे दाखल करत महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील अनेकांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरु असून, ज्यांनी खरे आर्थिक घोटाळे केले त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते भाजपच्या आशीर्वादाने शाबूत असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला.
नगर येथे पत्रकांराीश संवाद साधताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख आदींवर होत असलेल्या चौकश्या राजकीय आहेत. आम्ही चौकश्यांना घाबरत नाही. आमच्याकडेही भाजपात गेलेले आणि ज्यांची ईडी चौकशी व्हावी, अशांची यादी आहे. आम्ही यादी देणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू आहे, असा आरोप करतानाच या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचं काय झालं? हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असं आवाहन पाटील यांनी केलं.
