
। अहमदनगर । दि.28 सप्टेंबर । श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव भागातील कण्हेरमळा परिसरात मालट्रक (क्र. एमएच 16 एवाय 5535) आणि वॅगन आर गाडी (क्र. एमएच 12 पीक्यू 0144) यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत वॅगन आर गाडीमधील भाऊआप्पा शिवाजी काळे (वय 45 वर्षे. रा.हिवरे झरे, ता.नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दिनाक 25 रोजी रात्री घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दौंडकडून नगरकडे जाणारी भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकवरील (क्र.एमएच 16 एवाय 5535) नियंत्रण सुटल्याने मालट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूस गेला आणि नगरकडून दौंड कडे जाणार्या वॅगन आर (क्र. एमएच 12 पीक्यू 0144) गाडीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात वॅगन आर गाडीचा चुराडा होऊन गाडीतील भाऊआप्पा काळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकवरील चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला.
या प्रकरणाची माहिती बेलवंडी पोलिस ठाण्यात समजताच पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, पोलिस कर्मचारी मधुकर सुरवसे, बजरंग गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास बेलवंडी पोलिस करीत आहे.