। डॉ.शिवानंद भानुसे । दि.31 सप्टेंबर । मराठा सेवा संघाची स्थापना 1 सप्टेंबर 1990 रोजी अकोला येथे अॅड.पुरुषोत्तम खेडेकर व निर्मलकुमार देशमुख यांनी केली. सोबत आणि 17 सदस्य होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध कक्षाची स्थापना करण्यात आली. संपूर्ण देशात, राज्यात मराठा सेवा संघाचा प्रसार झालेला आहे. जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा, बळीराजा संशोधन केंद्र नागपूर, यासह विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. मराठा सेवा संघाची व विविध कक्षाची अनेक अधिवेशने, शिवधर्म परिषदा, शिवसन्मान जागर परिषदा, शिवशाहू यात्रा, एक वैचारिक प्रबोधनाचा विचार यातून पेरला गेला. सुरुवातीलाच बहुजन समाजाला पंचसत्ता सांगितल्या, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, प्रचार-प्रसार माध्यमसत्ता, या सर्व आजच्या महासत्ता आहेत. हे सांगण्याचं काम केलं.
शिक्षण ही सर्वोच्च सत्ता आहे. शिक्षण म्हणजे केवळ पदव्या प्राप्त करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची सोय करणे नाही तर नॉलेज इज पावर, आशिक्षिताने शिक्षित होणे, शिक्षिताने सुशिक्षित होणे, सुक्षक्षिताने सर्जनशील होणे आणि सर्व समाजासाठी योगदान देणे. आजच्या काळात प्रत्येक बहुजन व्यक्ती सर्वक्षेत्रात निपुण झाले पाहिजे, प्रत्येकाच्या घरात ग्रंथालय असले पाहिजे, प्रत्येक व्यक्ती बहुभाषिक असले पाहिजे, इंजिनिअर, वकील, डॉक्टर या पलीकडे अनेक ज्ञानशाखा आहेत. विषय आहेत. लोक काय म्हणतील याची काळजी न करता प्रत्येकाने आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असले पाहिजे.
नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे. त्याचबरोबर मराठा सेवा संघाने अर्थसत्ता रक्तासारखी गरजेची मानली आहे. त्यासाठी अनेक बँका व पतसंस्था उभारल्या आहेत. मराठा युवकांनी आर्थिक स्वावलंबनासाठी बूट पोलीस ते तेल मालिश करावे, कुठलीही लाज बाळगू नये, कोणताही व्यवसाय लहान नसतो, आईवडिलांनी मुलांच्या पाठीमागे ताकदिने उभे राहावे, धर्मसत्ता आपले जन्मापूर्वीचे ते मृत्यूनंतरचे जीवन व संस्कार प्रभावित करते. परंतु हिंदू धर्मात अनेक खोट्या बाबी घुसडल्या आहेत. त्या विरोधात चार्वाक, जैन, बुद्ध, लिंगायत, महानुभाव, वारकरी, जिजाऊ, शिवराय, शंभूराजे, फुले, शाहू, सयाजीराव गायकवाड असे समाजसुधारक लढले. मराठा सेवा संघाने शिवधर्म पर्याय दिला. जिजाऊ हे प्रेरणास्थान माणले.जय जिजाऊ हे अभिवादन दिले. महिलेस सर्वोच्च स्थान देणारा शिवधर्म जगात एकमेव धर्म आहे. आपले विधी संस्कार पूजा-पाठ कर्मकांड कोणत्याही इतर मध्यस्थाशिवाय आपण करणे हाच शिवधर्म आहे. त्याचबरोबर राजसत्ता व मानव यांचा प्राणवायू एवढा जवळचा संबंध आहे. संभाजी ब्रिगेड राजसत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
मराठा सेवा संघाच्या प्रबोधनामुळे मराठा व दलित व इतर बहुजन जातीतील संघर्ष थांबला असून ते वेगळा विचार करीत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातील समाज बांधवांना जोडण्याचे कार्य मराठा सेवा संघ करीत आहे. राज्याबाहेरील कुणबी व तत्सम शेतकरी जातीची समन्वय ठेवून कार्य सुरू आहे. हरियाणा येथील पानिपतच्या युद्धात परागंदा झालेल्या आठ लाख मराठा बांधवांची पुनर्भेट व चळवळीत सहभाग हा मोठा सांस्कृतिक विषय आहे. मराठा कुणबी, कुटुंबी, कुडमी, कुर्मी, कल्लर, नायर, रेड्डी, राजपूत आदी नावाने कार्यरत समाज संस्था व संघटना एकत्र येत आहेत. या सर्वांना एकत्र करून संपूर्ण बहुजन समाज जोडण्याचे कार्य मराठा सेवा संघ करीत आहे.
मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यावर जातीवादाचा आरोप करण्यात आला होता. परंतु मराठा सेवा संघाने सातत्याने वैचारिक भूमिका घेतली असून जाती पलीकडे जाणारी संघटना म्हणून मराठा सेवा संघाची ओळख निर्माण झाली आहे. जातीय व धार्मिक दंगलीमुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले होते. ब्राह्मण सोडून उर्वरित या दंगलीचे बळी ठरलेले आहेत. हिंदू मुसलमान दंगली घडवून त्यात मराठा तरुणाचा खूप मोठा गैरवापर करण्यात आला होता.अनेक आंदोलने पेटवून त्यात हजारो बहुजन मारले गेले. देशातील वातावरण सातत्याने अशांत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता.
राज्यामध्ये मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटवला जात होता.या संघर्षात बहुजनांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व बाबींचा मराठा सेवा संघाने नीट अभ्यास केला. प्रबोधन केले. दंगल घडवून आणणारे मेंदू शोधले. त्यांची कारणे शोधली. त्यामुळे होणारे नुकसान लक्षात आले. मराठा सेवा संघाने दंगली घडवणार्याना उघडे पाडले. मराठा बहुजनांना दंगलीत सहभागी न होण्याचे आव्हान केले. दंगलीतून ब्राह्मणी विचारांचा फायदा होतो आपण कशासाठी मारायचे, याचा विचार तरुणांना दिला.
त्यामुळे जातीय व धार्मिक दंगलींचे मोठ्या प्रमाणात उच्चाटन झाले. त्याचबरोबर मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे व सर्वच बहुजन महापुरुषांचा सत्य इतिहास समोर आणला.शिवराय हे कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक होते. ही महात्मा फुले यांची मांडणी समोर आणली. मुस्लिम समाजात प्रबोधन केले. दिशाभूल कळली. आज महाराष्ट्रात खूप मोठा प्रमाणात मुस्लिम बांधव शिवजयंती साजरी करतात हे मराठा सेवा संघ यामुळे घडले आहे. शिवराय, फुले, शाहू,आंबेडकर ही विचारांची साखळी जोडण्याचे कार्य मराठा सेवा संघाने केले.हा विचार एकच आहे.
सार्या समाजाला पटले त्यामुळे बहुजन, दलित, आदिवासी, मुस्लिम चळवळींनी बंधुभाव व समतेची वाटचाल सुरू केली आहे ही महत्त्वाची बाब आहे. शिवाजी महाराजांवर केवळ भावनिक प्रेम करण्यापेक्षा त्यांचे मानव मुक्तीचे कार्य समजून घेऊन वाटचाल करणारी तरुण पिढी तयार केली. शिवरायांवर बेगडी प्रेम करणारे जेम्स लेन प्रकरणात उघडे पडले. समाज जागा झाला. शिवरायांचे शत्रू समाजासमोर आणण्याचे काम मराठा सेवा संघाने केले. त्याचबरोबर इतिहासातील गोष्टी कशाला उकरून काढायच्या हा प्रश्न वारंवार विचारला जातो परंतु इतिहासातील वाद संपल्याशिवाय वर्तमानातील वाद मिटत नसतात. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण करून बहुजन समाजात गैरसमज पसरवण्यात आले होते.
याविरोधात मराठा सेवा संघाने यशस्वी कार्य केले आहे. करीत आहे. इतिहासाचे विकृतीकरण थांबून इतिहास लेखनाचा आग्रह मराठा सेवा संघाने धरला आहे. धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात ही सत्याची भूमिका मराठा सेवा संघ घेत आहे. यासोबतच शेती, शेतकरी, आत्महत्या, पाणी, वीज, बेकारी, अज्ञान, आरोग्य, कर्ज, शिक्षण,अर्थव्यवस्था, कोरोना, जागतिकीकरण अशा अनेक समस्या समाजासमोर आहेत. जग झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या काळात महामानवांचे विचार आत्मसात करून वर्तमान वाटचाल करण्यासाठी नित्य प्रबोधनाची गरज आहे.
ज्ञान हीच आता माणसाची ओळख झाली आहे. तुकोबांच्या शब्दांचे धन व शस्त्र यांची माहिती समजून घ्यावी लागेल. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाज जागृती व परिवर्तनाचे कार्य सुरू आहे. सत्य समजून घेऊन वाटचाल सुरू आहे. महामानवांचे समतावादी मानवी समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठा सेवा संघ कटीबद्ध आहे. मराठा सेवा संघाच्या विचारामुळे महाराष्ट्र, देशातील जीवनमान बदलले आहे. समाजात आपुलकी वाढली आहे. जातीय, धार्मिक दंगली थांबल्या आहेत.
हजारो तरुण-तरुणी कुटुंबे एक आनंदी श्रीमंत जीवनाचा लाभ घेत आहेत. अॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी अविरत कार्यरत राहून हजारो कार्यकर्ते प्रबोधनकार, लेखक तयार केले आहेत. त्या माध्यमातून गाव, खेडी ते शहर असंख्य कार्यक्रमातून सत्य विचार सांगितला जात आहे. माणसं बदलली आहेत. मराठा सेवा संघाने त्यांना घडवलं व माणूस बनवलं आणि योग्य दिशा देण्याचे काम केले ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एकंदरीतच समाजाला योग्य दिशा देणार वैचारिक संघटन मराठा सेवा संघ आज 32 वर्ष पूर्ण करीत आहे. त्यानिमित्त सर्वांना खूप खूप सदिच्छा.
डॉ.शिवानंद भानुसे,
प्रदेश प्रवक्ते,
संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र
shivanandbhanuse@gmail.com
98238 88778
