टोमॅटो खरेदीचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे राज्यांना आदेश

। नवी दिल्ली । दि.29 ऑगस्ट । भाव कोसळल्यामुळे अडचणीत सापडलेल्या देशातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांकडील टोमॅटो खरेदी करा, असे आदेश केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्याना दिले आहेत. मार्केट हस्तक्षेप योजनेतून ही टोमॅटो खरेदी करण्यास केंद्राने सांगितले आहे. त्यात होणाऱ्या तोट्यातील ५० भरपाई केंद्र सरकार राज्यांना देणार आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोच्या वाहतुकीचाही खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी अक्षरशः रस्त्यावर टोमॅटो फेकून देत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी टोमॅटो रस्त्यावर फेकल्याच्या घटना घडल्या आहेत. 

टोमॅटोला २ ते ३ रुपये एवढा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पियुष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना टोमॅटो खरेदी करण्याचे आदेश दिले. 

मार्केट हस्तक्षेप योजनेअंतर्गत हे टोमॅटो खरेदी करा, असे केंद्राने राज्यांना सांगितले आहे. यात होणाऱ्या तोट्यापैकी ५० टक्के पैसे केंद्राकडून राज्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती भारती पवार यांनी दिली. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post