। अहमदनगर । दि.26 ऑगस्ट । ईपीएस 95 पेन्शनर आंदोलनाच्या माध्यमातून हक्काच्या मागण्यांसाठी लढा देत आहे. लवकरच या पेन्शनरांचे पेन्शन वाढीसह इतर प्रश्न निकाली लागणार आहे. मात्र पेन्शनरांनी आंदोलनाचे शस्त्र खाली न ठेवता सातत्याने संघर्ष सुरु ठेवावा. ईपीएस 95 पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून देशात एकवटलेल्या संघटना शक्तीच्या जोरावर सरकारला न्याय हक्काच्या मागण्या मान्य कराव्या लागणार असल्याचा विश्वास ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी व्यक्त केला.
ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती संलग्न ईपीएस 95 पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या प्रश्नावर आयोजित जिल्हाव्यापी मेळाव्यात मार्गदर्शन करताना कमांडर राऊत बोलत होते. नेप्ती नाका येथील श्री मार्कंडेय संकुलात झालेल्या या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रीय सल्लागार डॉ.पी.एन. पाटील, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई आरस, राष्ट्रीय महिला आघाडी पश्चिम क्षेत्र सचिव सरिता नारखेडे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कमलाकार पांगारकर,
राज्याच्या महिला आघाडी अध्यक्षा कविताताई भालेराव, औरंगाबाद अध्यक्षा जोत्सना शर्मा, महाराष्ट्र संघटक डी.एम. पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंगअण्णा जाधवा, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, औरंगाबाद अध्यक्ष शशीकांत वाडगांवकर, नाशिक जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, नंदूरबार जिल्हाध्यक्ष गोरख माळी, बीड जिल्हाध्यक्ष हमीदभाई सय्यद, मराठवाडा उपाध्यक्ष दादाराव देशमुख, जळगाव जिल्हाध्यक्ष जीवन राणे, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष राज पाठक आदिंसह जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना कमांडर राऊत म्हणाले की, ईपीएस 95 पेन्शनरांनी आपल्या तरुणपणी देशासाठी योगदान दिले. मात्र त्यांचा वृध्दापकाळ सुसह्य होण्यासाठी सरकारने देखील त्यांची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. पेन्शनर फक्त प्रश्न घेऊन भांडत नसून, त्या प्रश्नांचे निराकारण करण्याचे उत्तर देखील त्यांच्या जवळ आहे. सरकारने फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. ईपीएस 95 पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी समित्यांवर समित्यांची नेमणुक करण्यात आली.
मात्र आता बुध्दी व पॉवरचा उपयोग करुन त्यांना न्याय देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. पेन्शनर चळवळ ही एक सेवा असून, संघटनेचा हा वसुलीचा धंदा नाही. पेन्शनरच्या विविध मागण्यांसाठी मागील तीन वर्षापासून बुलढाणा येथे चक्री उपोषण सुरु आहे. या उपोषणाला 19 सप्टेंबर रोजी एक हजार एक दिवस पुर्ण होत असून, या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयावर मुक मोर्चा काढण्याची त्यांनी घोषणा केली. दोनदा ईपीएस 95 पेन्शनरांच्या प्रश्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समोरासमोर भेट घेऊन चर्चा झाली. ही संघटनेच्या एकजुटीची ताकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय संघटक सचिव सुभाष पोखरकर, राज्य उपाध्यक्ष नारायण होन, जिल्हाध्यक्ष संपतराव समींदर यांनी केले. मागील वर्षी राष्ट्रीय संघर्ष समितीचे शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तर नुकतीच खासदार हेमा मालिनी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पुन्हा चर्चा झालेली असून याबाबतचा सविस्तर तपशील मांडण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ईपीएस 95 पेन्शनरांना कमीत कमी 7 हजार पाचशे रुपये दरमहा पेन्शन व निगडित महागाई भत्ता मिळावा, मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, हायर सॅलरी हायर पेन्शन लागू करावी, योजनेत समाविष्ट नसलेल्यांना दरमहा 5 हजार पेन्शन मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय सल्लागार डॉ.पी.एन. पाटील म्हणाले की, संघटित झाल्यावरच ईपीएस 95 पेन्शनरांना त्यांचे हक्क मिळणार आहे. पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय संघटक सचिव सुभाष पोखरकर यांनी या चळवळीला व्यापक स्वरुप दिले व अहमदनगर जिल्ह्यात संघटना मजबुत करुन सर्व पेन्शनरांना एकत्र आनले. कमांडर राऊत व विरेंद्रसिंग यांनी संघटनेचा विस्तार संपुर्ण भारतात केला असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय संघटक सचिव सुभाष पोखरकर म्हणाले की, ईपीएस 95 पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ईपीएस 95 पेन्शनर धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. इतर संघटना दहा वर्षापासून कार्यरत आहे. मात्र त्यांनी पावत्या फाडण्यापलीकडे दुसरे काही केले नाही. पंतप्रधानांशी दोनदा चर्चा झाली असून, लवकरच प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ईपीएस 95 पेन्शनरांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. पेन्शनरांना अन्न-धान्य मिळण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
