मुख्यमंत्र्यांना अपशब्द; नगरमध्ये पडसाद!

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचे दहन भाजप

भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी


। अहमदनगर । दि.24 ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात मंत्री राणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक एकवटले. आक्रमक घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी गांधी मैदानाकडे कूच करत शहर भाजप कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करत मंत्री राणेंच्या प्रतिमेला जोडे मारले. तसेच प्रतिमेचे दहनही करण्यात आली.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मी असतो तर कानशिलात मारली असती असे जहाल वक्तव्य आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, राज्यात राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या युवा शाखेकडून ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदनगरमध्येही शिवसेनेकडून तक्रार अर्ज देण्यात आला आहे.


जनाशीर्वाद यात्रेत महाड येथे राणे यांनी ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आज  सकाळपासून  राज्यभर  उमटत आहेत. त्यानंतर चिपळूण, नाशिक, पुणे याठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काहीशी झालेल्या गफलतीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अशा चुकीबद्दल मी कानशिलात लगावली असती, देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली,


स्वातंत्रदिनाचे हे अमृतवर्षं आहे की हिरक महोत्सवी वर्षे आहे हे ठाकरे यांना माहिती नाहीत, मी असतो तर कानशिलात लगावली असती असे वक्तव्य नारायण राणे यांनी महाड मध्ये पत्रकार परिषदेत केले होते. राणेंकडून असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांबाबत आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसोंदर,

जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक शाम नळकांडे, अभिषेक कळमकर, गणेश कवडे, स्मिता अष्टेकर, आशा निबाळकर, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड, दीपक खेरे, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, अमोल येवले, संतोष गेनापा, दत्ता जाधव, विशाल वालकर, काका शेळके, मृणाल भिंगारदिवे, संजय शेंडगे, रोहन ढवण आदी उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post