इंधन दरवाढीच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसच्या स्वाक्षरी अभियानाला सुरुवात ; शहरातून 31,000 नागरिकांच्या स्वाक्षर्‍या काँग्रेस संकलित करणार

। अहमदनगर । दि.19 जुलै । पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असून गगनाला भिडत आहेत. मोदी सरकार बद्दल यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात नागरिकांच्या स्वाक्षरी अभियानाला ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या हस्ते नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार्‍या या अभियानामध्ये 31,000 नागरिकांच्या स्वाक्षर्‍या संकलित केल्या जाणार आहेत.

शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ नुकताच झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माळी, जिल्हाध्यक्ष काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रिडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय कुलट, काँग्रेस एससी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, अजय मिसाळ, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, महिला सेवादल काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, माजी नगरसेविका जरीना पठाण, सुमन कालापहाड, उषाताई भगत, मंगल भुजबळ, रिजवाना पटेल,  शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या आदेशावरून नगर शहरामध्ये प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ.प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.मोहन जोशी, आ. डॉ. सुधीर तांबे, आ.लहू कानडे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, अभियानाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक तथा प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये इंधन दरवाढीविरोधात स्वाक्षरी अभियान राबविले जात आहे.

यावेळी बोलताना भानुदास माळी म्हणाले की, पेट्रोल, गॅस, डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. यामुळे महागाई वाढली आहे. कोरोना संकटाने आधीच पिचलेला सर्वसामान्य माणूस इंधन दरवाढ आणि महागाईमुळे कोलमडून पडला आहे. त्यातच बँकांच्या वसुली विभागांनी नोकरदार, छोटा व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी यांच्याकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्यामुळे नागरिकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. तरी देखील केंद्र सरकार मूग गिळून गप्प कसे काय बसू शकते ? असा सवाल माळी यांनी उपस्थित केला आहे.

किरण काळे म्हणाले की, सध्या शंभरी पार केलेले पेट्रोलचे दर, 900 रुपयांपेक्षाही अधिक वाढलेले गॅसचे दर येणार्‍या काही महिन्यांमध्ये 200 रुपये आणि 1000 रुपयांच्या वर गेले तर जनतेला आश्चर्य वाटू नये. मोदी सरकारची इंधन दरवाढ ही त्याच दिशेने जाताना दिसत आहे. असे झाल्यास सामान्य नागरिकच रस्त्यावर उतरून मोदी सरकारला जाब विचारतील. जनसामान्यांच्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधातील भावनांना काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम करीत आहेत. केंद्र सरकारने आता तरी ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा काळे यांनी दिला आहे.

ब्लॉक काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, मागासवर्गीय काँग्रेस विभाग, एससी काँग्रेस विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग, क्रीडा काँग्रेस विभाग, सेवादल काँग्रेस, डॉक्टर सेल, वकील सेल, असंघटित कामगार काँग्रेस विभाग, शिक्षक काँग्रेस तसेच काँग्रेसचे सर्व विभाग, फ्रंटल, सेल स्वाक्षरी अभियानाच्या यशस्वीतेसाठी काम करीत असून नगर शहरातून 31,000 नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post