। मुंबई । दि.02 जून । बॉलिवूडचे मराठमोळे कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते.
पण अखेर त्यांची ही कोरोनाशी सुरु असलेली झुंज अयशस्वी ठरली आणि कोरोनाने त्यांचा वयाच्या 92 व्या वर्षी बळी घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना मुंबईतील बांद्रा येथे होली फॅमिली रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
7 मे 2021 ला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर रुग्णालयीन उपचारादरम्यान त्यांची सातत्याने तब्येत खालावत होती. उतार वय असल्याने ते कोरोना विषाणूंवर मात करू शकले नाहीत आणि अखेर गेल्या गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
मारुतीराव काळे हे बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध कला दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. मात्र ते मूळ मराठी होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील 100 हून अधिक चित्रपटांचे अव्वल व लक्षात राहतील असे सेट तयार केले होते.
बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय व सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांनी सहजोगत्या केले होते. ’सौदागर’, ’डिस्को डान्सर’ अशा हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांच्या नावावर आहे. त्यांच काम हे बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी कायमच अविस्मरणीय ठरणार आहे.
