। मुंबई । दि.08 जून । काँग्रेसचे विधिमंडळ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याचे समजते. महामंडळ, समित्या, प्राधिकरणावरील नियुक्त्यांचा मुहूर्त लवकरच निघणार असून पंधरा दिवसांत प्रक्रिया स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची सोमवारी सकाळी भेट घेतली. यावेळी थोरात यांनी पवारांशी महामंडळ आणि समित्यांचं गठन करण्याबाबत चर्चा केली. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते मार्गदर्शक आहेत. त्यांच्याशी आम्ही नेहमीच चर्चा करत असतो. तशीच आजही चर्चा केली.
राज्यात ५० पेक्षा अधिक महामंडळे
राज्यात महामंडळांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. या महामंडळाच्या अध्यक्षांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा आहे. मंत्रिपद न मिळालेले आमदार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते महामंडळ मिळवण्यासाठी आग्रही असतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लगेच कोरोना संकट आले. त्यात दीड वर्षे गेल्याने महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.
