। अहमदनगर । दि.08 जून । अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटकच्या वतीने शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात मार्केटयार्ड चौकात बाजार समिती समोर शेतकरी विरोधी कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे बहिरनाथ वाकळे, सतीश पवार, फिरोज शेख, दीपक शिरसाठ सहभागी झाले होते. गेल्यावर्षी ५ जून २०२० रोजी रोजी केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते.
या अध्यादेशाविरोधात अखिल भारतीय किसान सभेसह सर्व शेतकरी समर्थक संघटना व किसान संघर्ष समन्वय समिती यांनी राष्ट्रव्यापी आंदोलन सुरु केले. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करा, कृषी निविष्ठा, बी-बियाणे, औषधे यांना जीएसटी मुक्त करा, या मागण्यांसाठी कृषी कायद्यांच्या प्रती जाळून इशारा दिवस पाळण्यात आला.
