कुलूप तोडण्यासाठी लोखंडी टॉमी न दिल्याने ट्रकचालकास मारहाण

। अहमदनगर । दि.07 जून । कुलूप तोडण्यासाठी लोखंडी टॉमी न दिल्याचा राग अनावर झाल्याने दोघांनी जालना येथील ट्रक चालकाला बेदम मारहाण केली. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी रात्री ही घटना घडली. परमेश्वर जाधव असे चालकाचे नाव आहे.

जालना येथील परमेश्वर जाधव हे ट्रक (एमएच 26 एच 8742) घेऊन कांदा भरण्यासाठी राहुरी बाजार समितीमध्ये आले होते. शनिवारी रात्री दुचाकीवर आलेल्या दोघांनी चालक जाधव यास लोखंडी टॉमीची मागणी केली. कुलूप तोडण्यासाठी टॉमी लागते, असे म्हटल्याने जाधव यांनी टॉमी देण्यास नकार दिला.

या रागातून दुचाकीवर आलेल्या दोघांनी ट्रकचालक जाधव यांना लाथाबुक्क्याने तसेच टॉमीने जबर मारहाण केली. मारहाणीत जाधव यांच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. मारहाणीची घटना घडत असताना बाजार समितीतील व्यावसायिक उपस्थित होते. मात्र,  यावेळी कोणीही या भांडणात पडले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post