। मुंबई । दि.10 जून । नियमित कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांसाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकर्यांसाठी एक आनंददायक घोषणा केली आहे.
राज्यात नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना मदत करणार असल्याचं तसेच काही प्रमाणात सवलत देण्याची घोषणा यापूर्वीच राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना तीन लाखांपर्यंतचं पिक कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
शेतकर्यांच्या आर्थिक अडचणी यामार्फत नक्कीच सोडवल्या जातील व प्रोत्साहनपर सरकारकडून मिळणार्या सवलतीमुळे जे कर्जदार नियमित कर्जाची परतफेड करत नव्हते ते देखील आता नियमित कर्ज परतफेड करतील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकर्यांना बिनव्याजी तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
यापूर्वी नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येत होतं. परंतु, आता ही रक्कम वाढवून तीन लाखांपर्यंत करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारतर्फे घेण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
