। अहमदनगर । दि.11 जून । नगर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा ऑनलाईन घेण्याचे घाटत असून, आता कोरोना संपण्याच्या मार्गावर असल्याने ही सभा ऑफलाईन घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (ता. 14) होणारी सर्वसाधारण सभा ऑफलाइन होते की ऑनलाईन याची उत्सुकता व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा मागील वर्षापासून ऑनलाइनच होत आहेत. यामुळे सदस्यांना आपली मते मांडता येत नाहीत. त्यामुळे सभा ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी सदस्यांची मागणी आहे. त्यातच आता जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेण्यात यावी, अशी मागणी सदस्यांमधून जोर धरीत आहे.
मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. ऑनलाइनच्याऐवजी त्या ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी मागील वर्षापासून सदस्यांकडून होत आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीत सभा घेणे शक्य नसल्याने सभा ऑफलाइन घेतली जात नव्हती.
जिल्हाधिकार्यांनी आता कडक नियमावलीत शिथिलता दिलेली आहे. त्यामुळे सभागृहात सभा घेणे शक्य आहे. लग्न समारंभांनाही 100 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी आहे, मग सभा घेणेही शक्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी सदस्यांमधून होत आहे.
