। मुंबई । दि.28 मे । मराठा आरक्षणावरून भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद वाढताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली आहे. राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिला नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच संभाजीराजेंनी गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या या भेटीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. ‘संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं.
पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल, तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’, असे म्हणत निलेश राणे यांनी छत्रपती संभाजीराजेंवर टीका केली आहे.
